वेळ: दुपारी ३ वाजता
दिवस: रंगपंचमी
सध्या वृत्तपत्र आणि टीव्ही वर स्त्री आणि त्यां वरील अत्याचार हे नेहमी चर्चेचे विषय असते. पूर्वी अत्याचार होत नव्हते आणि आतच होतात असे म्हणता येणार नाही. स्त्रीवर अत्याचार अगदी अनादीकाळा पासून होत असावे. रामायण आणि महाभारत हि याला अपवाद नाहीत. आता मात्र स्त्रियांची सुरक्षा हा खरेच चिंतेचा विषय झाला आहे.
स्त्रियांवर होत असलेले अत्याचारांचा संबंध आधुनिक परीधानाशी लावला जातो. तसे असते तर अश्या घटना एका विशिष्ट वर्गा पर्यंत सीमित राहिल्या असत्या. आकडेवारी याला विरोध करते. अश्या घटनेत स्त्रीचे वागणे आणि तिचे कपडे कसे, हे दुय्यम असते. पुरुषाची मानसिकता ही बळजबरीस कारणीभूत ठरते.
परवाच रंगपंचमी साजरी झाली. काही ठिकाणी धुळवडला (धुलीवंदनला) तर काही ठिकाणी रंगपंचमीला सुट्टी असते. सुट्टी नसल्यामुळे एक तरुण जोडपे कामास गेले पण काही कारणास्तव सुट्टी लवकर झाली. घरी येईस्तोवर अढीच वाजले. दोघे नोकरी करत असल्याने घरची कामे करायला २ मोलकरणी होत्या. एक सकाळी येई आणि एक संध्याकाळी. त्या दिवशी संध्याकाळ मोकळी मिळावी म्हणून त्यांनी संध्याकाळी येणाऱ्या मावशींना दुपारीच या असे कळविले. मावशींची इतर कामे लवकर झाल्याने त्या एव्हाना घरी पोचल्या होत्या.
मावशींना घरून बाहेर पडे पर्यंत तीन वाजत आले. बरेच लोक रंगपंचमी खेळून एव्हाना घरात पोचले होते. उन्ह असल्याने रस्त्यावर चीटपाखरू ही नव्हते. मावशी गेली २०- २५ वर्षे त्या भागात वेगवेगळ्या घरांत कामे करतायेत. जवळ असलेल्या वस्तीत त्या राहतात. मावशींना चार मुली असून दोघींची लग्न झालीत. कामाला जात असताना, रस्त्यात शेजारी अचानक एक गाडी थांबली. आतला माणूस म्हणाला, “आओ रंग खेलो, आओ मुझे गुलाल लागाओ”. मावशीनां काही कळेना पण त्या लक्ष न देत चालत राहिल्या. त्यांनी रास्त ओलांडला तर गाडी त्या बाजूस आली. पाऊले भरभर टाकत त्या जवळ जवळ धावत सुटल्या. रस्ताच्या दोन्ही बाजूस बंगले. कोणास हांक मारावी, पण कोणी दिसेना. वळणावर अचानक गाडी थांबली, आतला माणूस बाहेर आला त्याने मावशीस धरले आणि बळजबरी गुलाल लावला. हे सर्व इतके पटकन झाले कि त्या पळू हि शकल्या नाहीत किंवा त्यांच्या तोंडातून आवाज हि फुटला नाही. गुलाल लावून मस्करी करून तो गाडीवाला निघून गेला. एव्हाना कामाचे ठिकाण जवळ आले होते. त्या कश्याबश्या घरात गेल्या आणि पटकन खाली बसल्या. मग मात्र त्यांना खूप रडू कोसळले. तरुण जोडप्याला काही कळेना. मुलगी मावशीच्या पाठी वरून हात फिरवू लागली आणि तिच्या नवऱ्याने पाणी आणून दिले. थोडे शांत झाल्यावर मावशीने झालेला प्रकार सांगितला. त्या दोघांसाठी पण हे नवलच होते. असे काही होईल याची कोणास कल्पना नव्हती. मुलगा अस्वस्थ झाला. मावशींची माफी मागू लागला. जे काही घडले त्यास तो स्वतः ला दोषी समजू लागला.
प्रश्न असा हे कां घडले असावे. मावशी, मध्यम वयाची असून चार मुलींची आई आहे. तिचे नेसण अतिशय साधे आणि डोक्यावर पदर असतो. तो गाडीवाला काय म्हणून नीच हरकत करण्यास उतरला असेल.
देवळात बसविली कि स्त्रीची देवी होते पण तीच जर रस्तात दिसली तर “शिकार”? याच्या सारखे लज्जास्पद आणि काय असावे. आपल्या महान संस्कृतीच्या गप्पा मारणारे आम्हीच आहोत का? आम्ही आमच्याच देशात, राज्यात, गावात , वस्तीत सुरक्षित आहोत का?
This is a great post. If you can please hit follow I will be very grateful and follow back! Thank you http://yorkvillexpress.wordpress.com/
LikeLike