वस्त्र उद्योग: गम्मत!

काल रात्री नॉर्वेत गाऊन/मॅक्सी घालून शतपावली घालणारी आजी बघितली आणि मी चाट पडले (सुदैवाने खाली पडले नाही)!
अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाले होते म्हणे, आमचे एवढे भाग्य थोर कुठे, आम्हाला फक्त भारत दर्शन. गम्मत वाटली.
मड्डम्मा रात्री झोपताना नाईट गाऊन घाली, त्याची आमच्या काकू मंडळींनी ( हा एक सुपर सेट आहे, फूट पाडू नका) मॅक्सी केली आणि ती शयनकक्ष सोडून दिवाणखान्यात आली. आता तर हिला लोकाश्रय आहे! तर मंडळी भारतातील गल्ली बोळातील मॅक्सी नॉर्वेत येऊन ठेपली. आपण सर्वांचे अभिनंदन.

गोधडी भाग ३२: Sunny Sunday + Hiking + आलू पराठा

कहते हैं ” अकेला चना भाड  नाही झोंक सकता” तो क्या लेकिन अकेला शक्स पहाड चढ सकता है. वही काफी है.

जरा हवा सुधारली की एक रुपाली आणि समस्त नोर्वेजिअन घरा बाहेर पडायला हवेच. असे माझ्या “near and dear ” यांचे म्हणे आहे. तर आज रविवार वर सूर्य आणि हवा ठीक ठीक. सूर्य होता म्हणजे गरम असणार असे येथे नसते. गावात तपमान शून्यच्या जवळ पास होते . उन असल्याने थोडा फरक पडला होता आणि म्हणून डोंगरावर तपमान उणे ३ ते ५ डिग्री दरम्यान होते. येथे राहून योग्य कापडे घालायची सवय आपोआप लागते आणि मग नो टेन्शन. सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत हवा बरी राहणार होती याची माहिती कालच मिळाल्याने  आज लौकर उठून तशी तयारी केली आणि खाणे- पिणेचे साहित्य (आलू पराठा हा महत्वाचा आईटम) आणि कॅमेरा सोबत घेतले.

नेहमीच्या सवयी प्रमाणे पहिला थांबा ११०० फुटावर घेतला. अंतर फार नव्हते (साधारण पणे  साडेतीन किमी) पण काही ठिकाणी चढण दमवणारी होती. छोट्या विश्रांती नंतर मस्त फिरले फोटो काढले. ठिकठिकाणची तळी  संपूर्ण गोठली होती. लोकांनी दगड, झाडाच्या फांद्या टाकून पाणी वर येते का बघण्याचा प्रयत्न केला होता. लोक तळ्यात पुढे जात नव्हते, कारण धोका आहे ची पाटी होती.  वर बर्फ घट्ट असला तरी खाली पाणी असणार,  मोठ्या फांद्या आपटल्या कि  मोठा प्रतिध्वनी ऐकू येत होते.

अजून पुढे जायचे होते आणखीन दोन तळी  बघायला पण झाले नाही. वाटेत काही ठिकाणी पूर्ण रस्ता बर्फ होता आणि तो घट्ट झाला होता. माझे बूट योग्य नव्हते.

वाटेत एका ठिकाणी जेवण घेतले, आलू पराठाचे आणि सोबत कडक कॉफी. छान उन होते पण प्रचंड गारठा जाणवत होता. काही वेळासाठी हातमोजे काढले तर बोटे सुन्न झाली. मग ती काढण्याची चूक केली नाही. घरी येवून अंतर मोजले तर आजची फेरी साडे आठ किमीची झाली आणि सर्वात उंच ठिकाण १३०० फुटावर होते.

गोधडी १०: (शाळेत!) ऑफीसला रोज जाताना मज विघ्ने येती नाना

(शाळेत) ऑफीसला रोज जाताना                                                                                                              मज विघ्ने येती नाना                                                                                                                              कधी पक्षी गाती गाणी    …

मराठीतील निवडक बाल साहित्य “वाचू आनंदे” या पुस्तक संच मुळे  माझ्या पर्यंत पोचले. माधुरी पुरंदरे यांनी संपादित केलेली हि पुस्तके ज्योत्स्ना प्रकाशन ने बाजारात आणली. त्यातील एक पुस्तकात  ना. ग. लिमयेंची ही सुंदर कविता माझ्या वाचनात आली आणि मनात घर करून राहिली. लहान मुलांचे विश्व उलगडून सांगणारी हि कविता आहे.  रोज शाळेत जाणे भाग आहे पण मोहात पाडणाऱ्या इतर अनेक गोष्टी पण सोबत आहेच. तरी शाळेत जाणे काही थांबत नाही.

आता ही कविता आठवायचे कारण “ऑफीसला रोज जाताना मज विघ्ने येती नाना” आणि त्याचे सोपे कारण आहे “कुतूहल”. येथे हवामान रोज बदलते. त्यामुळे रोज रोज दिसणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या दिसतात. वर बदलत्या मौसम मुळे यात भरच पडते. रोज ऑफीसला जाताना वाटेत ठराविक लोक दिसतात. काही एकटे तर काही कुणा सोबत. प्रत्येकाची भेटायची आणि लपायची ( वाटेतून हटायची ) जागा साधारण ठरलेली असते. गम्मत म्हणजे ही भेट तेवढ्या वेळा पुरतीच असते.  या सर्वांमुळे उशीर होत नाही पण ते routine चा भाग होते. तर ही झाली माणसांची भेट.

वाटेत लागणारी झाडे सोबत त्यावरील फुले, पाने आणि पक्षी नुसते लक्ष वेधत नाही तर त्यांच्यात एक ओढ असते. काही केल्यास दुर्लक्ष करणे कठीण असते. यात भर पडते ती पाणी आणि आकाशची. या सर्वांनी केलेली माझ्या विरुद्ध ची “conspiracy” जणू. रोज मी असे “निरीक्षण” कां करते?  ऑफिसला पोचायची इतर साधने असताना ही मी रोज कां चालते? याला उत्तर नाही!  काही जणांना वाटते बापरे मी रोज कसे एवढे चालते. आणि ते सुद्धा ऑफिसला जाताना आणि येताना. नियमित फिरायला जाणारे खूप असतात पण ऑफिसला चालत जाणारे जरा कमीच सापडतात.  थोडक्यात मला ते आवडते. धो धो पाऊस असताना, जबरदस्त वारा असताना देखील वाटेतील गोष्टी मला आनंद देतात. अमुक तमुक झाडाला पालवी आली असेल, कळीचे फूल झाले असेल, पक्षी आज घरट्यात असतील की नाही, समुद्र शांत असेल का, अश्या अनेक गोष्टींची उत्सुकता माझा रोजचा प्रवास interesting करते.

हल्लीच एका ब्लॉग वर वाचलेले आठवते, “एका विमान प्रवासात ढगा वरून सूर्योदय  पाहिल्या पासून माझ्या डोक्यात एक किडा शिरला आहे, सूर्योदय पाहायला मिळणार असेल तर विमानातील सीट निवडून घेतो”. आवडी निवडी अशाच पद्धती ने नकळत आपल्या जीवनाचा भाग बनतात.

तर ऑफिसला जाताना विघ्ने आणणाऱ्या गोष्टींचे मी फोटो देत आहे.

परि उशीर टाळायला                                                                                                                                    मी निघे तडक ऑफीस ला!

I have taken these pictures on my way to office.

गोधडी भाग ९: घर घ्यावे (बोली लावी ) पाहून (an adrenaline rush)

एक किस्सा:

नॉर्वेत एक म्हण आहे, घराच्या भाड्या साठी पैसे देणे म्हणजे खिडकीतून पैसे बाहेर टाकणे.

एकाने घर घ्यायचे ठरविले. मग शोध सुरु केला. एक घर पक्के केले. जागा बघितली. पसंत पडली. ज्या कंपनी ने घर विकण्याची जवाबदारी घेतली होती, तेथे नाव नोंदवले. घर दाखवायच्या दिवशी बरेच लोक होते,  सगळेच जण घर घेण्यास उत्सुक असतात असे नाही तर काही औत्सुक म्हणून पण बघायला येतात. दाखवण्याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या  दिवशी सकाळी नऊला बोली सुरु झाली. घराच्या दिलेल्या रकमेपेक्षा थोडी कमीची पहिली बोली होती. पहिला तास कसली गडबड नव्हती. तास संपायच्या आत दुसरी बोली दोनशे हजार जास्त ची होती. आणि मग मात्र म्हणता म्हणता, कधी दहा हजार जास्त तर कधी पन्नास हजार जास्त करत दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी ते घर मागितलेल्या किमती पेक्षा आठशे पंचवीस हजार (आठ लाख पंचवीस हजार) जास्त रकमेने  विकले गेले.  घर योग्य दारात गेले कि जास्त मिळाले माहित नाही, विकणारा आणि घेणारा समाधानी असावे बाकीच्या साठी मात्र तात्पुरते नैराश्य. उद्या पासून परत शोधाशोध सुरु. सकाळ चे ते तीन-चार  तास मात्र घर मालक, तो एजंट, आणि चढा ओढीत गुरफटलेले इच्छुक यांचे adrenaline वाढविण्या साठी पुरेसे असतात.

कोणाला वाटेल त्यात घर मालक आणि एजंट यांनी मिळून खोटा फुगवता तर आणला नसेल ना किंवा कोणी उगीच बोली लावत नसेल कशा वरून. तर त्याची येथे शक्यता नाही. कारण सगळ्याची रीतसर नोंदणी असते. तुमची बोली जास्त असेल तर मग मात्र तुम्ही अडकता आणि घर घेणे तुम्हास भाग पडते. बोली लावणे बच्चो का काम नहीं हैं. आपल्या कडे काही जण घर घेवून विकण्याचा हि धंदा करतात. येथे एक घर असताना दुसरे घेतले तर जबरदस्त आयकर भरावा लागतो.  घराचे वर्षाचे मूल्य हे घरमालकाच्या वार्षिक मालमत्तेत धरले जाते म्हणजे ते आयकर साठी ग्रहाय होते.  सगळा व्यवहार बँके तर्फे होतो तेंव्हा काळा बाजारची शक्यता राहत नाही.

गोधडी भाग ७: निखळ आनंद

Beauty is whatever gives joy ~ Edna St. Vincent Millay

Weekend walks give me happiness, pleasure and energy. They rejuvenate my spirit. I took these pictures during one of our weekend walk.
“वीकेंड” ज्याची सगळे वाट बघत असतात. भारतात बहुदा वीकेंड म्हणजे शॉपिंग, भाजी बाजार ते मॉल, via इथे-तिथे. आठवडाभर सवड न मिळाल्याने ते करणे अर्थातच गरजेचे असते.  हल्लीच्या ट्रेंड वरून दुसरी कडे कुठे जाणार म्हणून मॉल  भटकंती करणारे काही कमी नाही आहे. ज्याची त्याची आवड. शेवटी “जो जे वांछील तो ते लाहो…”
येथे रविवारी बाजार बंद, आणि जी दुकाने शंभर चौरस  मीटर पेक्षा मोठी आहे ती सुद्धा बंद ठेवावी हा कायदा आहे. बरीचशी खरेदी लोक शुक्रवारी नाही तर शनिवारी करतात. वीकेंड हा घरगुती कामं करण्यासाठी आणि घरच्यां साठी.  सबंध दिवस घरात बसून राहणे नोर्वेजिअन माणसांना जमण्या सारखे नाही. बर्फ सुरु झाला रे झाला कि स्कीईंग आणि बर्फ गेला हि हायकिंग, सायकलिंग असे प्रकार. थोडक्यात काउच पोटेटो सापडणे कठीण, आपल्या म्हणतात न खुर्ची तोडणे. तसे खुर्ची तोडणारे कमीच असतात. हवामान कसे हि असो बाहेर फेरफटका मारलाच पाहिजे. येथे एक म्हण आहे “Det finnes ikke dårlig vær, bare dårlig klær“, म्हणजे हवा कधीच वाईट नसते, वाईट (चुकीचे) असतात ते कपडे. 🙂
आता “संगती चा असर” किंवा आणखीन काय असेल पण नोर्वेजिअन सहकारी आणि मित्र यांच्यामुळे आमचे फिरणे/चालणे खूप वाढले आहे. मुख्य म्हणजे आम्ही हि त्यात आनंद घ्यायला शिकलो आहोत. हे फिरणे, नुसते हेल्थ आणि फिटनेस याच्या साठी असे नव्हे तर निव्वळ आनंद घेण्यासाठी पण होते. तर एकदा फेर फटका घेताना काढलेले काही फोटो देत आहे. तुम्हा मंडळीना ते आवडतील अशी अशा वाटते. एक सांगावे से वाटते, मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही. तुम्ही तज्ञ असाल तर मार्गदर्शन जरूर करा. मला आवडेल.

The same sky: ऊपर गगन विशाल

निसर्गाने आपल्या अवती- भवती  रंगाची इतकी उधळण केली आहे कि माणसाने निरीक्षण करायचे आणि आनंदी राहायचे ठरविले तर एक दिवस रिकामा जाणार नाही पण निसर्गाने जे फुकट दिले त्याचे कौतुक किती  जणांना असते देवच जाणे ( त्याने तरी कशा कशाचा हिशोब ठेवावा! ).  अजिबात वेळ मिळत नाही हे जेंव्हा लोक म्हणत असतात तेंव्हा मला “joke” ऐकल्याचा भास होतो.

लोकांना इतरांच्या भानगडीत लक्ष घालायला आवडते, मला त्यात अजिबात रस नाही.  मला झाडे, पाने, फुले, पक्षी, जनावर आणि जे काही डोळ्यास दिसते त्यात रस आहे,  फक्त माणसांची लफडी सोडून सगळे बघायला आवडते.  आणि हो त्यावर चर्चा करायला पण आवडते.  ब्लॉग सुरु केल्या पासून आणि हाती कॅमेरा आल्या पासून यात भर पडली आहे. चालायचे.

आकाश तेच असते पण रोज त्याची छटा निराळी असते. काल बागेत काम करत असताना ही चित्रे काढली.

गोधडी भाग ४: सहृदयता/kindness

पेपरात रोज येणाऱ्या बातम्यांची वर्गवारी विभागणी केली तर, चांगल्या बातम्या कमी आणि वाईट बातम्यांची, अर्थात वाईट घडलेल्या गोष्टींची संख्या जास्त असणार. याचा अर्थ समाजात सगळे वाईटच घडत असते का? कि जे काही चांगले घडते किंवा सुरळीत होते त्याच्या कडे आम्ही सपशेल दुर्लक्ष करतो. वाईट गोष्टी लांब पर्यंत जातात किंवा लक्षात राहतात. असो.

cover3aug14२० मार्चला सूर्य ग्रहण झाला. ग्रहण म्हटले कि आपल्या कडे बरेच जण प्रवास टाळतात, नवीन काम सुरु करत नाही आणि बरेच काही. पण बरेच जण तो पाहतात देखील अर्थातच योग्य पद्धतीने. तर, त्या दिवशी माझा नवरा प्रवासात होता. विमान KLM कंपनीचे होते.  विमान ३५००० फुटावर होते. आकाश निरभ्र होते. आणि सूर्यग्रहण सुरु झाले होते.  विमान चालकाने विमान दोन वेळा पूर्ण गोल फिरवले जेणे करून विमानातील सर्व प्रवासी सूर्यग्रहण पाहू शकतील. माझ्या नवऱ्याने ज्या शब्दात आणि भावनेत त्या प्रसंगाचे वर्णन केले ते लिहिणे मला जमणार नाही पण प्रवाश्यांचा येवढा विचार करणाऱ्या वैमानिकाचा चांगुलपणा मी इतरां बरोबर share करावा असे मला वाटले.

हे दोन्ही फोटो माझ्या नवऱ्याने ३५००० फुटा वर काढले आहेत.

These images display amazing view of the solar eclipse from flight to Amsterdam on 20th of  March 2015. Crystal clear sky at 35,000 feet.  KLM pilot circled twice so that everybody could get a good view of the eclipse. “It was surreal to have this experience…” as my husband said. I thought it would be very appropriate to share the thoughtfulness of the pilot. Just to say thank you.