तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर बेहेत्तर.
मूळ मुद्दा हा की हि अतिशबाजी मी मोती साबण, त्याचा कागद/चांदी, त्याची साठवण, आठवण… नंतर वेगवेगळ्या लाडवाचे आकार, त्यांचे प्रकार आणि त्यातील बेदाणे या वर पाहिली/वाचली. तुम्ही जाणकार मंडळी नी अर्थातच ती वाचली असणारच म्हणून ती माझ्या पर्यंत पोचली. आणि हो पुढे जाऊन विनोद बेशिस्ती आणि गबाळे राहणे किंवा टापटीप न राहणे वर देखील होते. थोडक्यात काय तर आम्ही मराठी माणसे आपापसात पण एकोप्याने राहू शकत नाही. बरे आता कसला हि टेंभा मिरवायचा झालाच तर एक सत्यकथा सांगते.
त्या आधी एक फॅक्ट, महाराष्ट्राच्या उत्तरे कडे म्हणजे मध्यप्रदेश आणि पुढे, मराठी माणसाला “कढी-चट” हे टोपण नाव आहे. कारण काय तर म्हणे ती फडतूस ताकाची कढी देखील मराठी माणूस शेवटी सोडत नाही, तर चाटून संपवतो. आणि मराठी माणसात सगळे आले, सब घोडे बारा टक्के.
आता सत्यकथा, मी युनिव्हर्सिटीत शिकत असताना एकदा माझी एक प्राध्यापिका (अतिशय सज्जन बाई असे प्रत्येकाचे मत होते नव्हे अजून आहे!) मला म्हणाली मराठी माणसे चांगली पण काय ग तुमच्या पद्धती. मी अर्थातच चाट पडले. प्रश्न बोलून दाखवावा लागला नाही. किस्सा असा, ” काल मी एका जुन्या विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते. दुपारचे लग्न होते आणि त्यात काल पाऊस होता. जावे कि नाही याच्या विचारात होते पण आग्रहाचे आमंत्रण होते म्हणून इथला तास संपवून गेले. मंगल कार्यालयाच्या बाहेर बरीच गर्दी दिसली. माणसे हळू हळू पुढे जात होती. पाऊस असल्याने सगळ्यांची पंचाईत होती. मी दारा जवळ पोचल्या वर कळले की दारात दोन्हीं पक्षाचे लोक याद्या घेऊन उभे होते. आलेला पाहुणा तुमचा कि आमचा याची खात्री करून आणि त्याचे नाव खोडून आत सोडत होते. किती ग चिकू पणा हा. मी वेगवेगळ्या समाजातील लग्न पहिली हि अशी मात्र पहिलीच वेळ”. आम्हीं का तुमच्या मंडळींचे जेवणाचे पैसे द्यायचे हा सरसकट मुद्दा असावा. माझ्या तो वरच्या आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग. मला काय म्हणावे सुचेना. आडनाव विचारले तर दोन्ही बाजू ची मंडळी एका पोटजातीची नसून शत्रू पक्षातील (हे ही आपणच ठरवले आहे) होती. कोणाला वेगळं म्हणायची सोय नाही.
लग्ना नंतर सासरी घरांतल्या मंडळी कडून ओळखीच्या एका लग्नाचा असाच किस्सा ऐकला, त्यात वधूचा भाऊ का कोण त्यांच्या कडील यादी घेऊन फिरत होती. खातरजमा करून आपल्या यादीतील लोकं मोजत होता. शेवटी वराकडच्या एका जेष्ठाने सांगितले कि पैशाची तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो पण माणसे मोजायची नाही.
तर बोला आता. तुम्ही शहाणे कि आम्ही शहाणे!
You must be logged in to post a comment.