मध्यम (सुशिक्षित) वर्गाला कधी जाग येईल?

Governments are not representative. They have their own power, serving segments of the population that are dominant and rich. ~Noam Chomsky
Noam Chomsky चे वाक्य वाचून वाटते, तो नेहमीच सरकार, राज्यकर्ते यांच्या विरोधात लिहितो. मग या ओळी त्याचाच एक भाग असतील. अमेरिकेतील माहीत नाही, पण आपल्या कडे हे असू शकते? आणि ते उच्चशिक्षित वर्गाला जाणवत नाही का? मग कोणी या विषयी आवाज का उठवत नाही?
शनिवारच्या लोकसत्ते मधील संपादकीय चा काही भाग …
आपल्या बँकांचं औदार्य इतकं की, यातल्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या तोटय़ांत सणसणीत वाढ होत असतानाही बँकांनी या उद्योगांसाठी आपली पतपुरवठय़ाची मूठ सैल केली. त्याचा परिणाम असा झालाय की, यातल्या काही उद्योगांच्या डोक्यावरील कर्जात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २४ टक्क्यांनी वाढ झालीये. हे कर्जवाढीचं प्रमाण इतकं आहे की, या कंपन्यांनी ज्या प्रकल्पासाठी र्कज घेतली त्या प्रकल्पावर त्या कंपन्यांकडून केल्या गेलेल्या खर्चापेक्षा जास्त रक्कम या उद्योगांनी घेतलेल्या कर्जाची आहे. जगात असं कुठे नसेल. यातला धक्कादायक भाग हा की, समस्त भारतीय बँकांनी उद्योगांना जी काही र्कज दिली त्यातला जवळपास १५ टक्के रकमेचा भला मोठा वाटा या दहा उद्योगांवर खर्च झालेला आहे.
आणखी एक गमतीचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा. तो म्हणजे हे सर्व उद्योगपती आपापल्या वैयक्तिक बँकिंग गरजांसाठी खासगी बँकांमध्ये खाती उघडणार. एचडीएफसी, आयसीआयसीआय वगैरे अशा चटपटीत बँकांत यांची खाती असणार आणि आपल्या उद्योगासाठी कर्ज घ्यायची वेळ आली, की मात्र ते राष्ट्रीयीकृत बँकांतून घेणार. हे असं का?
उत्तर साधं आहे. ते म्हणजे सत्ताधारी राष्ट्रीयीकृत बँकांची मुंडी पिरगाळू शकतात. अशा बँकांच्या अध्यक्षाला फोन करून सांगू शकतात अमुकतमुकला कर्ज द्या म्हणून. या सत्ताधाऱ्यांचं खासगी बँका थोडंच ऐकणार. ते काम सरकारी बँकांचंच. त्याचमुळे सरकारी बँकांनी मुक्तहस्ते कर्ज या आणि अशा उद्योगांना देऊन आपल्या एकंदर अर्थव्यवस्थेला भलं मोठं खिंडार पाडून घेतलंय.
कोणी कोणास मदत केली हे म्हत्वाचे नसून, सरकार कोणाचे हि असले तरी त्यांची जवळीक/सलगी  मोठ्या उद्योगपतींशी असते, सर्व सामान्य जनतेशी नाही. या संदर्भात ज्यांना ज्ञान आहे ते जर गप्प बसत असतील तर मग हे थांबणार कसे?