भेटी

लिहिण्यास कारण हे की हल्लीच एका “अमृत महोत्सव” सोहळ्यास हजेरी लावली. आजकाल आपल्या कडे घरगुती समारंभ थोडे आणि सोहळेच जास्त असतात. कारण काहीही असो.

तर हा समारंभ एका आजी साठी होता आणि त्यांच्या मुलींनी/मुलांनी आणि इतर कुटुंबीयांनी तो योजिला होता. घरच्यांनी कौतुक केल्या वर मग इतर आप्तेष्टांनी भेटी देण्यास सुरु केले. नाही नाही म्हणत १५ – २० साड्या, १०-१५ शाली, ५-१० चादरी, काही पाकिटे आणि इतर गोष्टी गोळ्या झाल्या. सोबत मिठाई चे डबे होतेच.

अधून मधून संभाषण असे होते की, अगं  खूप दिवसापासून यायचेच होते भेटायला  पण जमलेच नाही, या निमित्ता  ने भेटणे झाले. मागे काही महिन्या/वर्षा पूर्वी कुठल्या तरी कार्या निमित्त  भेट झाली होती वगेरे वगेरे. वाक्ये आलटून पालटून सारखीच होती. पूर्वी आजी कडे कामा निमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त असावी. असे वाटण्याचे कारण हे ऐकू वाक्य “पूर्वी भेटणे जास्त होत होते”. आजी कामात आणि मदतीला चोख, त्या मुळे  तिची बऱ्याच जणांना अडी – अडचणीत मदत झाली. पण झाले गेले आपल्या सोयी ने विसरणे हा समाजाचा अलिखित नियम आहे.

बहुतेकांनी आवर्जून सांगितले दिलेली वस्तू वापर हं. सांगितले प्रेमाने असावे आपण मानूया. पण तो भेटींचा ढीग बघून मनात आले की आजींना या सर्व गोष्टींचा खरच उपयोग आहे का? नाही न, मग काय देणे  योग्य असावे?

भेटी देताना, काही तरी द्यायचे म्हणून दिले या पेक्षा थोडी कल्पकता  असावी.  आर्थिक परिस्थिती चांगली असली कि वृद्ध व्यक्तींना वस्तू पेक्षा साथ-सोबत गरजेची असते.   ती कशी देत येईल ते पाहावे. एखाद  सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ त्यांच्या साठी ठेवली तर? त्यांना कुठे फिरायला घेवून गेला तर? त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या तर? त्यांना नियमित फ़ोन  केला तर. हे वाटते तितके अवघड नाही, फक्त त्यासाठी आम्ही आमचा “बिझी आहोत” चा बुरखा बाजूला काढायला हवा.  आणि दुर्देवाने आर्थिक बाजू कमकुवत असेल तर नीट विचार करून योग्य अशी मदत करावी.

मुली – सुना नोकरी करायला लागल्या पासून आणि विभक्त कुटुंब झाल्या पासून आजी- आजोबांच्या जवाबदाऱ्या  वाढल्या आहेत. मग त्यांचा वापर हि जास्तं  होवू लागला आहे. ते कामाचे असे पर्यंत नियमित संवाद/संबंध ठेवणे आणि नंतर त्यांच्या गरजेच्या वेळीस आपल्या व्यस्थतेचे कारण सांगणे, हे योग्य नव्हे.

“पाणी नेहमी पुढे जाते” असे म्हणतात. थोडक्यात आपल्या मुलांची काळजी म्हणून त्यांच्या वर नजर  ठेवायची, त्यासाठी  सोबतीस  mobile , फेसबुक, whatsup वरून संपर्कात असायचे. पण आधीच्या पिढीत असणाऱ्यांना मात्र “विशिष्ट दिवशीच” आठवायचे. त्या दिवशी एक फोन मारायचा, आपला फेसबुक स्टेट्स अपडेट करायचा आणि मोकळे वहायचे. परत वर्षाची विश्रांती.  जर कोणी समारंभ केलेच तर एक भेट देवून मोकळे व्हायचे.

William Arthur Ward चे सुंदर वाक्य आहे,

God gave you a gift of 86,400 seconds today. Have you used one to say ‘thank you’?