आनंदाची अनुभूती!

आईच्या हातची चव जगात कुठे ही सापडत नाही आणि अगदी म्हणजे अगदी तुरळक वेळी बाबाच्या हातची चव सुद्धा.

एखादा पदार्थ आपण शर्यतीने शिकायचा प्रयत्न करतो. एकदा,  दोनदा, तीनदा,अनेकदा प्रयत्न करतो मग

Cauliflower and Rice pilaf

Cauliflower and Rice pilaf

नाद सोडून देतो. आपल्या लक्षात येते की पदार्थ करणे म्हणजे  रेसिपी विचारून, सर्व मांडून आणि पद्धतशीरपणे  मोजून मापून वस्तू घालण्याच्या पलीकडचे आहे.  आई शेजारी उभी राहिली तरी. मग  ते “magic” असते तरी काय!

मला एका इटालियन मैत्रिणी ने पास्ता (tagliatelle) करण्याच्या पद्धतीवर सांगितलेली हकीकत, ” पास्ता लाटायच्या आधी ओळखायचे कसे कि पीठ तयार आहे हे तिने जेंव्हा तिच्या आजीला विचारले तेंव्हा उत्तर आले होते अगदी सोपे आहे, मळलेले पीठ स्वतःच बोलते आणि सांगते कि मी तयार आहे”.  खरेच आहे काही गोष्टी गूढच असू द्याव्यात आणि आपण फक्त आनंद घ्यावा.

तर फ्लावर (cauliflower ) ज्याला काही भागात गोभी, गोबी किंवा फूलगोबी म्हणतात ही भाजी अगदी सोपी असते आणि भारत भर सगळी कडे बऱ्याच कुटुंबात आवडी ने खाल्ली जाते. माझा आईने  केलेली भाजी मस्त असते. लहानपणी चे बरेच किस्से या भाजी भोवती आहेत. पिकनिक वर जाताना असो, किंवा काही विशेष असल्यास असो पण सिझन मध्ये हि भाजी नेमाने असायची. कोणी कंटालळलेले  माझ्या आठवणीत नाही. उलट काही वेळा पाहुण्यान कडून फर्माईश असायची.  अतिशयोक्ती नाही पण मित्र मैत्रिणी आपल्या आयांना हि भाजी शिकून घ्यायला सांगायचे.

मी ही भाजी करते पण आई सारखी करण्याची उर्मी आता नाही. कारण सोपे आहे कित्येक हजार वेळा करून सुद्धा तशी झाली नाही.  असो. आज अगदी थोडी करायची होती म्हणून विशेष लक्ष न घालता सवयी ने केली. जेवायला बसले, पहिला घास तोंडात घातल्या वर जाणवले अरेच्या! विश्वास बसला नाही मग दुसरा घास घेतला आणि तेंव्हा मात्र “आनंदाची अनुभूती” झाली.
किती लहान गोष्ट आहे पण केवढा आनंद मिळाला.  उद्या सकाळी पहिले काम, “आईला फोन करणे”.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.